पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अकोल्याचे राजेंद्र पातोडे; अंतर्गत लोकशाहीच्या प्रक्रियेतून बहुमताने निवडून आले


प्रतिनिधी / मुंबई :

महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडीच्या संघटन रचनेमध्ये एक अत्यंत ऐतिहासिक टप्पा पार पडला असून, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अकोला येथील अभ्यासू आणि आक्रमक नेते राजेंद्र निरंजन पातोडे यांनी घवघवीत यश मिळवले आहे. पक्षांतर्गत पार पडलेल्या या लोकशाही प्रक्रियेत राज्यातील ८,७१६ हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत बहुमताने विजय मिळवत राजेंद्र पातोडे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

​क्रीडा व पत्रकारितेतून संघर्षाचा श्रीगणेशा

​राजेंद्र पातोडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात क्रीडा व सामाजिक माध्यमातून केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) मिळवल्यानंतर त्यांनी अकोल्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये तब्बल ९ वर्षे निष्पक्ष पत्रकार म्हणून सेवा बजावली. या काळात त्यांनी तळागाळातील शोषित व वंचित घटकांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडली.

​३५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय व संघटनात्मक प्रवास

​१९९० मध्ये भारिप बहुजन महासंघाच्या अकोल्यातील कृषी नगर (वार्ड क्र. १२) शाखाध्यक्षपदापासून त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात केली.

​२०००: अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.

​२००४: अकोला जिल्हा युवक आघाडीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

​२००९ व २०१२: अमरावती विभागातील ५ जिल्ह्यांचे (अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ) सलग दोन वेळा विभागीय अध्यक्ष.

​२०१८: ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’चे संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोठी फळी उभी करत विद्यार्थी चळवळ मजबूत केली.

​२०१९: अकोला लोकसभा निवडणूक सुकाणू समिती सदस्य तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते.

​युवा आघाडीची भक्कम उभारणी: प्रदेश महासचिव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून राज्यभरात युवा आघाडीचे संघटन मजबूत केले.

​साहित्यिक योगदान: १०४ वर्षांच्या इतिहासाचे दस्तवेजीकरण

​संघटनेतील कामासोबतच साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी ‘आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न (१९२०-२०२४)’ या ग्रंथातून अकोला जिल्ह्यातील १०४ वर्षांचा ऐतिहासिक पट मांडला आहे.

​या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय-सामाजिक उदयापासून (१९२०) ते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या काळापर्यंतच्या (२०२४) सर्व घडामोडींचा सविस्तर इतिहास समाविष्ट आहे. ‘प्रबुद्ध भारत’ द्वारे प्रकाशित या ग्रंथाला खुद्द ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रस्तावना लाभली असून, १४ मे २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले होते.

​जनहितासाठी आक्रमक आंदोलने

​अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

​अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची हवा काढण्याचे अभिनव आंदोलन असो वा अकोला-महान रोडवरील हजारो वृक्षांचे प्राण वाचवण्यासाठी चालवलेले ‘चिपको आंदोलन’, त्यांनी अनेक लढे यशस्वी केले.

​जातीय तणावाच्या प्रसंगी सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि पोलीस अत्याचार व प्रशासकीय अन्यायाविरोधात नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव अग्रभागी राहिले आहेत.

​”पक्षाला मजबूत पर्याय म्हणून उभे करणार” — राजेंद्र पातोडे

​निवडीनंतर प्रतिक्रिया देताना राजेंद्र पातोडे यांनी पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. “हमाल, रिक्षाचालक, घरगुती कामगार, महिला आणि विविध कर्मचारी संघटनांना पक्षाशी जोडून तळागाळात संघटन अधिक मजबूत केले जाईल. मुंबईत स्थायी प्रशिक्षण केंद्र उभारून कार्यकर्त्यांचे राजकीय व निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण केले जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!