नवी दिल्ली | प्रतिनिधी :
बीड जिल्हा कारागृहासंदर्भात प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
खासदार सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, बीड जिल्हा कारागृहाबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा, मोबाईल फोन वापरण्याची मुभा तसेच इतर अनुचित लाभ दिले जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, कारागृह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाकडून तातडीने सविस्तर अहवाल मागविण्यात यावा आणि चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती खासदार सोनवणे यांनी दिली.
याप्रसंगी खासदार सोनवणे यांनी, “बीड जिल्ह्यातील नागरिकांना पारदर्शक, निष्पक्ष आणि उत्तरदायी कारागृह प्रशासन मिळावे तसेच कायद्याचे राज्य अधिक बळकट व्हावे, यासाठी या विषयाचा शेवटपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असून दोषींवर कारवाई होईपर्यंत आवाज उठवत राहणार,” असा निर्धार व्यक्त केला.












