मुंबई:
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरेचे अपील दाखल करून घेत त्याला जामीन मंजूर केला, तसेच मुख्य अपील प्रलंबित असेपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली.
पुणे विशेष न्यायालयाच्या शिक्षेविरोधात सचिन अंदुरेने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी करताना खंडपीठाने सीबीआय (CBI) तपासातील त्रुटींवर ताशेरे ओढले.
न्यायालयाने नोंदवलेली प्रमुख निरीक्षणे:
साक्षीदारांच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह: घटनेच्या वेळी उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटनेनंतर तब्बल ८ ते ९ वर्षांनी न्यायालयात आरोपीची ओळख पटवली. तसेच सीबीआयने दाखवलेल्या छायाचित्रांवरून त्यांनी अंदुरेची ओळख पटवली नव्हती.
कबुलीजबाब संशयास्पद: अंदुरेने एका साक्षीदारासमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचा तपास यंत्रणेचा दावा घटनेनंतर ५ वर्षांनी आणि अंदुरेच्या अटकेनंतर समोर आला होता. या दाव्याला कोणताही स्वतंत्र किंवा ठोस पुरावा जोडलेला नव्हता.
बॅलिस्टिक अहवालाकडे दुर्लक्ष: मुंब्रा पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्तूल आणि गोळ्यांचा मेळ डॉ. दाभोलकरांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्यांशी बसत असल्याचे बॅलिस्टिक अहवालात नमूद होते. मात्र, तपास यंत्रणेने या महत्त्वाच्या मुद्द्यावर पुढील तपास केला नाही किंवा न्यायालयात समाधानकारक खुलासा दिला नाही.
तपासातील या सर्व गंभीर त्रुटींची दखल घेत उच्च न्यायालयाने सचिन अंदुरेच्या शिक्षेला स्थगिती देत त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.











