केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विलास घुले यांची २० जून रोजी केज तालुक्यात हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र तपासाच्या प्रक्रियेवर सोनवणे यांनी आक्षेप घेत पोलिसांवर कोणताही दबाव आहे का, असा सवाल उपस्थित केला.
या प्रकरणातील एका आरोपीच्या सीडीआरमध्ये त्याच्या मुलाचा कुठेही संबंध आढळला, तर आपण स्वतः त्याला पोलिसांच्या हवाली करू, असे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितल्याचा उल्लेख सोनवणे यांनी केला. “माझा मुलगा पळून गेलेला नाही किंवा लपून बसलेला नाही. त्यामुळे कोणताही संबंध नसताना त्याचे नाव या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न करू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘सदानंद दाते यांचा बीड पोलिसांवर विश्वास नाही का?’
विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बीड पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत सोनवणे यांनी तपास यंत्रणेच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. बीड पोलिसांनी दोन दिवस तपास केल्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली असून, तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज | सत्याचा आवाज, जनतेची ताकद












