अंबड प्रतिनिधी(रामकिसनअवधूत) :
अंबड तालुक्यातील उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात गैरव्यवहार झालेला आहे. जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी व तालुका अभियान व्यवस्थापक मंजित कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मुकेश डुचे यांनी १७ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार बाबत निवेदन दाखल केले आहे. या निवेदनात अंबड तालुक्यातील महिला ग्रामसंघ, प्रभागसंघ, व्यावसायिक गट तसेच विविध शासकीय योजनांच्या निधी वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महिला ग्रामसंघाकडून साहित्य खरेदीच्या नावाखाली ३१७०४ रु रक्कम जमा करण्यात आली मात्र साहित्य १०,०००/ देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम कोणी हडप केली त्यावर चौकशी ची मागणी केली आहे. उत्पादक गट /व्यावसायिक गट (PG) यांना मंजूर करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यात आली, आलेल्या निधीच्या वितरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, या निधीमध्ये अधिकाऱ्यांचा कथित वाटा असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. मागील दोन वर्षांपासून अंबड तालुक्यात काही प्रभाग संघामध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नाही. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची जिल्हा परिषदेतील वर्ग-१ च्या अधिकाऱ्यामार्फत पुढील १५ दिवसांत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास दोन्ही व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.












