सुखापुरी. प्रतिनीधी ( रामकिसनअवधुत) — अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा येथील चिंतामणी पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतीची कामे अंतिम टप्प्यात असताना डिझेलअभावी कामे खोळंबली असून सकाळपासून शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रांगेत उभे आहेत.
जिल्हाधिकारी आसीमा मित्तल यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी थेट ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर येत आहेत. मात्र, संबंधित पंप चालकांकडून ट्रॅक्टरमध्ये डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उलट, ओळखीच्या लोकांना कॅनद्वारे डिझेल दिले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
डिझेल उपलब्ध असूनही “डिझेल भरण्यासाठी माणूस नाही”, “वीज गेली आहे” अशी कारणे सांगून वाहन चालकांची अडवणूक केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतातील पेरणी, मशागत व इतर अत्यावश्यक कामे थांबली आहेत. वेळेत डिझेल न मिळाल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाकडे पुरवठा विभागाने तातडीने लक्ष द्यावे, पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुखापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात ट्रॅक्टर चालक रुस्तुम मोताळे, हृषीकेश तांदळे, बाबुराव शिंदे, प्रल्हाद राखुंडे, अविनाश मोताळे, जिजाभाऊ मोताळे, रवि कांबळे आदींनी आपली व्यथा मांडली. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.












