पोलिस प्रशासन न्यूज.

हिंगणी खुर्द गावातील पांदण रस्ते होणार अतिक्रमण मुक्त; तहसीलदारांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा


बीड: तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पांदण रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वतः पुढाकार घेत या भागाची पाहणी केली असून, रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत.

​प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी

​गुरुवारी (दि. २१) तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी जायभाय आणि तलाठी इनकर यांनी हिंगणी खुर्द गावातील विविध पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. भर उन्हात तहसीलदार शेळके यांनी तब्बल दोन तास पायी चालत तुळजाभवानी मंदिर रस्ता, नागरगोजे वस्ती, आंधळे वस्ती आणि मुंडे वस्ती अशा विविध ठिकाणच्या रस्त्यांची सविस्तर पाहणी केली.

​शेतकऱ्यांच्या समस्या आणि पार्श्वभूमी

​हिंगणी खुर्द हे गाव मांजरा नदीच्या काठावर वसलेले असून येथे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, शेतातील माल (ऊस) कारखान्याला नेण्यासाठी आणि दैनंदिन दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते अनेक ठिकाणी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले होते. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.

​”ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता आम्ही संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पांदण रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून लवकरच हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत.”

— चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड.

​गावकऱ्यांची प्रतिक्रिया

​या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक शेतकरी सचिन आंधळे यांनी सांगितले की, “हिंगणी खुर्द हे ऊस उत्पादक गाव आहे. शेतातील ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी हे पांदण रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या मागणीमुळे प्रशासनाने स्वतः पाहणी केल्याने आमचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे.”

​उपस्थिती

​या पाहणी दौऱ्यादरम्यान हिंगणी खुर्दचे सरपंच संतोष तांदळे, सोसायटीचे चेअरमन सचिन आंधळे यांच्यासह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार शेळके यांनी सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करून ग्रामस्थांसाठी खुले केले जातील, असे आश्वासन यावेळी दिले.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!