पोलिस प्रशासन न्यूज.

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा बडगा; आष्टी, पाटोद्यासह अनेक तालुक्यांत खदाणी व स्टोन क्रशर सील


बीड:

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, साठा आणि विनापरवाना चालणाऱ्या स्टोन क्रशर्सविरोधात बीड जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली महसूल पथकांनी विविध तालुक्यांमध्ये अचानक धाडी टाकून अनधिकृत खदाणी व क्रशर्स सील करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर थेट ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

​आष्टी, पाटोदा तालुक्यांत मोठी कारवाई

प्रशासनाने केलेल्या तपासणीत आष्टी तालुक्यात २० हून अधिक स्टोन क्रशर व दगड खदाणी तात्काळ सील करण्यात आल्या. तसेच पाटोदा तालुक्यातील विविध गावांमधील अनधिकृत खदाणींवर छापे मारून त्या बंद पाडण्यात आल्या आहेत. याशिवाय बीड, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर तालुक्यांतही महसूल पथकांनी अचानक तपासणी करत नियमबाह्य काम करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला आहे.

​थेट फौजदारी गुन्हे व MPDA चा इशारा

अनधिकृत उत्खनन, साठा किंवा वाहतूक करताना आढळणाऱ्या वाहनांवर व यंत्रसामग्रीवर दंडात्मक कारवाईसह जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात असून, सराईतपणे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​शासकीय नियमांचे पालन करण्याचे आदेश

जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक व स्टोन क्रशरचालकांनी शासकीय परवानग्या अद्ययावत ठेवाव्यात, तसेच नियमानुसार स्वामित्वधन (Royalty) आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधी वेळेत भरावा. नियम डावलून उत्खनन करणाऱ्यांची गय केली जाणार नसून व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा सक्त इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

​नागरिकांना कुठेही अवैध रेती, मुरूम, माती किंवा दगड उत्खनन सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!