औसा: (प्रतिनिधी)
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (SEBI) आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट निवेशक’ या विषयावर एक दिवसीय जागरूकता कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्राचार्य सौ. रणबीधरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेबी आणि एम.सी.एक्स. चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री. गणेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सध्याच्या काळातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.
आर्थिक साक्षरतेवर भर:
मार्गदर्शन करताना श्री. चौधरी यांनी फायनान्शिअल मार्केट्स, कमोडिटीचे विविध प्रकार आणि जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीजची माहिती दिली. तसेच वेअरहाऊसिंग, डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट, आणि कमोडिटी व इक्विटी मार्केटमधील मूलभूत फरक यांसारख्या तांत्रिक विषयांवर सोप्या भाषेत प्रकाश टाकला.
फसवणुकीपासून सावधान:
गुंतवणूक करताना डिमॅट अकाउंटचे महत्त्व सांगतानाच, विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिकृत मार्गानेच गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सेबीच्या ‘सारथी’ (Saa₹thi) ॲपची उपयुक्तता सांगून फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन डोंगरे यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी आय.टी.आय. मधील विविध विभागांतील विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













