केज | प्रतिनिधी
बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित, साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पंकजा रमेश चौरे हिची १४ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघात निवड झाली आहे. पंकजाच्या या यशामुळे केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अकोला येथे दि. २२ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय १४ वर्ष वयोगट शालेय बेसबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी केली. या संघातील पंकजा चौरे हिचा उत्कृष्ट खेळ पाहून तिची निवड आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संघात करण्यात आली आहे.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
पंकजाच्या या यशाबद्दल बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रेवन्नाथ शेलार, तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, केज तालुका क्रीडा अधिकारी राखी यादव यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड, संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनकर थोरात, मार्गदर्शिका डॉ. कविता गित्ते व श्री. कापसे सर यांनी पंकजाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. रामदास सानप, श्री. तरकसे, कृष्णा गित्ते, केशव कराड, श्री. साखरे, श्री. घुले आणि श्रीमती कांदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले. ग्रामीण भागातील आणि विशेषतः ऊसतोड कामगार कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या संस्थेच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याने सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.













