हरेगाव येथे ‘ख्रिस्ती हक्क परिषद’ हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
अहमदनगर / श्रीरामपूर :
ख्रिस्ती बांधवांवर होणाऱ्या असंवैधानिक कारवाया आणि अन्यायाविरोधातील लढ्यात ख्रिस्ती समाजाने स्वतःला कधीही एकटे समजू नये; वंचित बहुजन आघाडी प्रत्येक संघर्षात ख्रिस्ती समाजाच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहील, अशी ठाम ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवानेते सुजात आंबेडकर यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील ऐतिहासिक हरेगाव येथे आयोजित करण्यात आलेली ‘ख्रिस्ती हक्क परिषद’ हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली.
घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेगावच्या भूमीत त्यांचेच प्रपौत्र सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभल्यामुळे या परिषदेला विशेष सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. भारतीय संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे अधिकार यांचे रक्षण करणे तसेच ख्रिस्ती समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा घडवून आणणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
याप्रसंगी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी व्यासपीठावरून ख्रिस्ती समाजाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ख्रिस्ती समाजावर बेकायदेशीररीत्या लादण्यात येणारी बंधने, असंवैधानिक कारवाया आणि धार्मिक स्वातंत्र्यावर होणारे आघात यांकडे त्यांनी सुजात आंबेडकर यांचे लक्ष वेधले.
या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य पदाधिकारी प्रा. किसन चव्हाण, नगरसेवक अरुण जाधव, दिशा शेख, उत्कर्षा रुपवते, प्रशांत बोरुडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, उपाध्यक्ष बबलू पगारे, योगेश गायकवाड, तालुकाध्यक्ष सागर खरात, आकाश इंगळे, ग्रामपंचायत सदस्य विशाल पठारे, विलास अहिरे, बाळू खरात, राहुल गायकवाड व तेजस कटरणवरे उपस्थित होते.
तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सावन वाघमारे, श्रीरामपूर तालुक्यातील ज्ञानदेव शेळके, श्रीकांत बोरुडे, मेजर विश्वरंजन मकासरे, भिकाजी कांबळे, ब्राह्मने, ब्र. सोनू धिवर यांच्यासह विविध चर्चचे फादर्स, पास्टर्स, पदाधिकारी आणि ख्रिस्ती समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेसाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या संपूर्ण टीमला व राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांना निमंत्रित करण्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस तथा महासंघाचे श्रीरामपूर तालुका संघटक सुनील वाघमारे यांनी विशेष पुढाकार घेतला. ख्रिस्ती समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी या परिषदेने एक भक्कम व्यासपीठ निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












