केज :
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तरनळी येथील तांदळे वस्तीवरील शाळेची इमारत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला आणि १८ चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये सध्या प्रशासनाविरुद्ध तीव्र संतापाचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
१८ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हलक्या पावसामुळे लव्हुरी केंद्रांतर्गत येणाऱ्या तरनळी येथील तांदळे वस्तीवर असलेली षटकोनी आकाराची शाळा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून जमीनदोस्त झाली. या धोकादायक इमारतीत परिसरातील सुमारे १८ विद्यार्थी रोज जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. शाळा रात्रीच्या वेळी बंद असतानाच ही दुर्घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
प्रशासनाचा भयंकर निष्काळजीपणा
हलक्या आणि रिमझिम पावसातही शाळेच्या छतातून पाणी गळत असे. शाळा पूर्णपणे धोकादायक अवस्थेत असल्याची लेखी व तोंडी माहिती ग्रामस्थांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि महसूल विभागाला वारंवार दिली होती. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली. प्रशासन एखादी मोठी दुर्घटना किंवा विद्यार्थ्यांच्या जिवाचे बरेवाईट होण्याची वाट पाहत होते का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
अधिकृत प्रतिक्रिया आणि ग्रामस्थांचा संताप
या घटनेबाबत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी सांगितले की, “या वस्ती शाळेच्या इमारतीचे छत पावसाने गळत असून पाणी ठिबकत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. आम्ही त्याची माहिती वरिष्ठांना दिली होती.”
तर स्थानिक नागरिक चांगदेव सानप यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “आम्ही या धोकादायक इमारतीची माहिती मागील दहा वर्षांपासून देत आहोत, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि निकृष्ट बांधकाम करणाऱ्या गुत्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.”
या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने पर्यायी जागेत वर्ग सुरू करावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.












