दीनदयाल शोध संस्थान, केव्हीके अंबाजोगाई आणि ‘आत्मा’ बीडच्या वतीने ५ दिवसीय कौशल्य प्रशिक्षण सुरू
गोठा बांधणीवरील अनावश्यक खर्च टाळा; डॉ. वसंत देशमुख यांचा सल्ला
अंबाजोगाई (प्रतिनिधी):
ग्रामीण युवकांनी पशुपालनाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता व्यावसायिक व उद्योजकीय दृष्टिकोनातून पाहावे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठ, उपलब्ध मनुष्यबळ, भांडवली गुंतवणूक, चालू खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यांचा परिपूर्ण विचार करून व्यवसाय आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘आत्मा’, बीडचे प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान, कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व आत्मा, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांसाठी आयोजित ‘पशुसंवर्धन व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षणा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख होते.
अनुत्पादक खर्च कमी करून टप्प्याटप्प्याने विस्तार करा
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पशुपालनातून नफा वाढवण्यासाठी अनुत्पादक खर्च कमी करण्यावर भर दिला पाहिजे. गोठा बांधणीवर सुरुवातीलाच अनावश्यक मोठा खर्च न करता, उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करावा. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात काम सुरू करून अनुभवानुसार टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा विस्तार करावा, तसेच परिसरातील यशस्वी पशुपालकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला.
२१ ते २५ सप्टेंबरदरम्यान सर्वसमावेशक प्रशिक्षण
या पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणात गाय-म्हैस पालन व आधुनिक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
संतुलित पशुआहार आणि आधुनिक चारा व्यवस्थापन
पशु आरोग्य, वेळेवर लसीकरण, प्रजनन व जैवसुरक्षा
स्वच्छ दूध उत्पादन तंत्रज्ञान
पशुधन व्यवसायाचे अर्थशास्त्र व वित्तीय नियोजन
मूल्यवर्धन, उत्पादनांचे ब्रँडिंग व डिजिटल मार्केटिंग
पशुधन विमा आणि विविध शासकीय योजनांचे लाभ
या सर्व घटकांवर तज्ज्ञांमार्फत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे परिसरातील तरुणांना सक्षम पशुधन उद्योजक बनण्यास मोठी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.












