केज/प्रतिनिधी:
तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी रोहन गलांडे पाटील हे गेल्या ११ दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेले वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी मस्के यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “जर येत्या सोमवारपर्यंत अतिक्रमणे हटविण्याची ठोस कारवाई झाली नाही, तर केज संबंधित कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही,” असे मस्के यांनी ठणकावून सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परिसर, छत्रपती संभाजीराजे चौक, नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज सभागृह रोड या भागातील अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी रोहन गलांडे पाटील यांनी १७ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ११ दिवस उलटूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन आणि वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
राजकीय दबावाचा संशय
उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून ती आता चिंताजनक बनली आहे. असे असतानाही संबंधित प्रशासन राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनाच्या या पळवाट काढण्याच्या भूमिकेमुळे जनक्षोभ उसळला आहे.
बाबुरावजी मस्के यांचा आक्रमक पवित्रा
वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी मस्के यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रोहन गलांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तत्काळ तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि प्रशासकीय दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? एका तरुणाचा जीव धोक्यात असताना संबंधित अधिकारी गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोमवारपर्यंत कारवाई न झाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी चिंचोली माळी येथील नागरिक, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता सोमवारच्या अल्टिमेटमनंतर केज प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













