केज:प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केज शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
बंदची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, केज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर जय भीम, जय संविधान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शहरातून शांततेत रॅली काढण्यात आली. रॅली तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे हा भारतीय लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी तसेच संपूर्ण घटनेची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई गुंड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल खोडसे, बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष लखन हजारे तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.यावेळी प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
केज शहरातील व्यापाऱ्यांनीही बंदला चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, लिंबराज गायकवाड, रज्जाक शेख, धनराज सोनवणे,अमोल हजारे,पप्पु सिरसट, शरद धिवार,प्रवीण मस्के, उमेश कांबळे, आनंद शिनगारे, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण ओव्हाळ, सतीश बनसोडे,रोहन जोगदंड, दिपक वाघमारे,तानाजी वाघमारे, यांच्यासह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभेच्या महिला-पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते












