पोलिस प्रशासन न्यूज.

लातूर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातूनच जावा; खासदार बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


बीड | प्रतिनिधी

लातूर-कल्याण या प्रस्तावित ‘जनकल्याण’ राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा महामार्ग मूळ नियोजनानुसार बीड जिल्ह्यातूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

​जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्ग महत्त्वाचा

​खासदार सोनवणे यांनी २७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, लातूर-कल्याण महामार्ग हा बीड जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतीपूरक उद्योग, व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळेल. तसेच, यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

​मार्ग बदलल्यास जनतेत असंतोष

​सध्या हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळविण्याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते. यावर चिंता व्यक्त करताना खा. सोनवणे म्हणाले की, “जर मूळ आराखड्यात बदल करून हा मार्ग जिल्ह्याबाहेरून नेला, तर तो बीडच्या जनतेवर मोठा अन्याय ठरेल. अशा निर्णयामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.”

​असा आहे मूळ प्रस्तावित मार्ग

​शासनाने मंजूर केलेल्या मूळ प्रस्तावानुसार हा महामार्ग खालील शहरांमधून जाणे अपेक्षित आहे:

​लातूर – अंबाजोगाई – केज – बीड – जामखेड – अहिल्यानगर.

​विकासाला खिळ बसण्याची भीती

​बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत हा महामार्ग जिल्ह्यासाठी ‘जीवनवाहिनी’ ठरू शकतो. काही घटक जाणीवपूर्वक या मार्गात अडथळे आणत असून मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा बदल झाल्यास जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला ब्रेक लागेल, असा इशाराही सोनवणे यांनी पत्रात दिला आहे.

​त्यामुळे, जनहिताचा विचार करून शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता महामार्गाचा मार्ग बीड जिल्ह्यातूनच निश्चित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!