पोलिस प्रशासन न्यूज.

माणसाला माणूस म्हणून जगण्याकरिता उपासकांना तथागतांनी उपदेश रूपाने मार्गदर्शन केले….पूज्य भिक्खू धम्मशील थेरो.


(ज्येष्ठ पौर्णिमा दिनी महाविहार धम्मभूमी मौजे शिवणी येथे धम्मदेशना संपन्न)

बीड( प्रतिनिधी) महाकारूनीक तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात ज्या अविस्मरणीय घटना घडल्या, त्या पौर्णिममेंचा आणि चांगल्या घटनांचा भगवंतांच्या जीवनात जाणू काही माणिक कांचनांचा योग आहे. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा महाविहार धम्मभूमी मौजे शिवणी येथे प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड तर्फे दर पौर्णिमेला महाराष्ट्रातील विविध विद्वान भिक्खूंच्या देशनेचे आयोजन केले जाते.

ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला पूज्य भिकू धम्मशील थेरो यांच्या मंत्रमुग्ध देसनेप्रसंगी त्यांनी आपल्या धम्मदेशनेत स्पष्ट केले की माणसाला माणूस म्हणून जगण्याकरिता उपासकांना तथागतांनी उपदेश रूपाने मार्गदर्शन केले होते व तथागतांनी आपल्या उपदेशात सांगितले की होते की मी “मार्ग दाता आहे, मोक्षदाता नव्हे” तेव्हा सांगितलेला धम्म म्हणजे काय ? धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म हे समजण्याकरिता उपासक उपासिकांनी विहारात येणे व धम्मदेसना ऐकून तसे आचरण करणे किती गरजेचे आहे हे समजावून सांगितले.

सर्वप्रथम पूज्य भिकू संघातर्फे तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पुष्पदीप धुपाने पूजन करण्यात येऊन त्रिवार वंदन करण्यात आले.तदनंतर पूज्य भंतेजींच्या क्षमा याचनेनंतर प्रमुख अतिथी व सत्कारमूर्तीच्या हस्ते आदर्शांचे पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय विजय नरवाडे व मौजे शिवनीचे सरपंच माननीय विजय सुपेकर व नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक प्राध्यापक राम गायकवाड यांचा संस्थेच्या उपस्थित आजीवन सभासदांच्या हस्ते हृद्ध सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सदस्या अलकाताई डोंगरे यांच्या प्रयत्नांनी 17 महिला पुरुषांनी नुकतीच बुद्धगया धम्म सहल संपन्न केली. त्या उपस्थित धम्म बांधव भगिनींचा सत्कार करण्यात आला. बुद्धगया येथून आणलेले पवित्र चिवर धम्मयात्रेकरुनी पूज्ज भिक्कू धम्मशील थेरो यांना विहारात असलेल्या तथागतांच्या मूर्ती करिता अर्पण केले. तर कुसुमताई गायकवाड परिवाराकडून पूज्य भिकू धमशील थेरोंना चीवरदान केले. सेवानिवृत्ती सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक राम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की लातूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातून वडिलांच्या फुले,शाहू,आंबेडकर विचारधारे नुसार प्रथम लातूर येथे अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देऊन शिक्षण घेतले व एम कॉम झाल्यानंतर बीड येथील राष्ट्रीय कन्या कनिष्ठ महाविद्यालयाला प्राध्यापक म्हणून रुजू झालो. बीड येथे प्राध्यापक बाळकृष्ण हंकारे, रघुनाथ चौधरी,संतोष मुसळे सर व विविध संघटनातील पदाधिकारी आणि प्रा. प्रदीप रोडे तसेच पूज्य धम्मशील थेरो अशांचा सहवास लाभला व तथागतांच्या धम्मनीतीनुसार आचरण ठेवून जीवनात त्रिसरण पंचशील आणि अष्टांगिक मार्गाने जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करून जे काही यश प्राप्त झाले ते तथागताच्या धम्माचे पालन केल्यामुळेच झाले व अशा प्रकारच्या जीवनातील घडलेल्या अनेक प्रसंगाद्वारे भाऊक होऊन सांगितले. जीवनात संसार सुखी व्हायचा असेल तर पत्नीची साथ किती महत्त्वाची असते व पतीच्या यशाचे श्रेय पत्नीला कसे जाते हे आपल्या डॉक्टर झालेल्या मुलीची व उच्च शिक्षण घेत असलेल्या सुसंस्कारित मुलाचे उदाहरण देऊन सांगितले.

पूज्ज भिकू धम्मशील थेरो आपल्या रसाळ धम्मदेशनेत पुढे म्हणाले की जगात, तथागतांनी आपल्या उपदेशात सांगितले की पती-पत्नी चार प्रकारचे असतात व पती-पत्नी करिता त्यांनी उपदेश केला होता. दुष्टपुरुष (राक्षस वृत्ती) दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल, दुष्टपुरुष देवते बरोबर (सद्गुनी सतशील) रहात असेल, सतपुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि जर सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर रहात असेल. पहिल्या तीन स्त्री पुरुष जोड्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या सुखदुःखाबद्दल, परिवारावर होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल अत्यंत सोप्या भाषेत तर शेवटच्या सतपुरुष व देवता तुल्य पती-पत्नी जोडी बद्दल त्यांच्या जीवनात सुख, समाधान, शांती, करुणेची साथ कशी मिळते हे अनेक उदाहरणाद्वारे आपल्या धम्मदेशने सखोल मार्गदर्शन केले व उपस्थिततांना विचार करण्यास व जीवनात कसे वागावे याबद्दल विचार प्रवृत्त करून तथागतांनी सांगितलेला उपदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे एकाग्रतेने वाचन करून आपल्या जीवनाची वाटचाल ठेवावी तरच दुःखमुक्ती कडे आपली वाटचाल राहील असे मनात पक्के रुजवावे असा मोलाचा उपदेश केला.

आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्करराव सरपते यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनिअर वसंतराव तरकसे यांनी केले. कार्यक्रमास प्रियदर्शनी धम्म संस्कार शिक्षण संस्थेचे बहूतांश सदस्य धाराशिव जिल्ह्यातून व बीड परिसरातील उपासक उपासिकांची उपस्थिती होती. धम्म सहल संपन्न करून आलेल्या धम्म बंधू भगिनींनी भोजनदान दिले तर उपासक पंचशील सरपते यांनी खीरदान केले.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!