बीड | प्रतिनिधी
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “पद्मपाणी पुरस्कार” यंदा बीडचे सुप्रसिद्ध निवेदक मा. महादेव जनार्धन इनकर यांना “उत्कृष्ट निवेदक” म्हणून जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकारिता, शिक्षण, प्रशासन, सामाजिक कार्य, उद्योग, साहित्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी उत्कृष्ट सूत्रसंचालन, प्रभावी आवाज आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत महादेव इनकर यांची निवड करण्यात आली आहे.
महादेव इनकर यांनी अनेक शासकीय कार्यक्रम, सत्कार समारंभ, जिल्हा परिषद ध्वजारोहण सोहळे, सामाजिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती उत्सव, विवाह समारंभ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या दमदार आवाजाची शैली, अचूक शब्दफेक आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली आहेत.
बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवर कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या निवेदनाची वेगळी छाप निर्माण केली असून, महागायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमातही त्यांनी यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विनम्र स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वत्र आदराने पाहिले जाते.
त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही बीड येथील शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
रविवार, दि. 17 मे रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जतीन रहमान साहेब तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महादेव इनकर यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.














