पोलिस प्रशासन न्यूज.

उष्णतेची प्रचंड लाट; अंगणवाडीतील बालके आणि बालहक्कांचा गंभीर प्रश्न — सौ आशाताई बाजीराव ढाकणे, बालहक्क कार्यकर्त्या, बीड


बीड प्रतिनिधी :- राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट पसरली असून विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वयोगटातील बालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर होते. विद्यार्थ्यांना विश्रांती, खेळ, प्रवास आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. मात्र, राज्यातील सुमारे दीड लाख अंगणवाड्या या कालावधीत सुरूच राहतात. त्यामुळे बालहक्क, पोषण, मानसिक आरोग्य आणि प्रशासनिक जबाबदारी यामधील समतोलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बालहक्क कार्यकर्त्या तथा सचिव श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड सौ आशाताई बाजीराव ढाकणे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके उष्माघात, निर्जलीकरण आणि थकवा यांसारख्या समस्यांना सहज बळी पडू शकतात. ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांमध्ये पुरेसे पंखे, थंड पिण्याचे पाणी किंवा सुरक्षित खेळाचे वातावरण उपलब्ध नसते. त्यामुळे वाढत्या उष्णतेमध्ये बालकांना नियमितपणे अंगणवाडीत बोलावणे हा केवळ प्रशासनिक विषय नसून आरोग्य आणि बालसुरक्षेचाही गंभीर प्रश्न ठरतो.

उन्हाळी सुट्टी ही केवळ शिक्षणातून विश्रांती नसून बालकांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळांना सुट्टी लागल्यानंतर मोठी भावंडे नातेवाईकांकडे किंवा मामाच्या गावी जातात. अशा वेळी कुटुंबातील केवळ तीन ते सहा वर्षांच्या मुलांना अंगणवाडीसाठी थांबवणे अनेक पालकांना शक्य होत नाही. परिणामी अंगणवाड्यांमधील उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटलेली असते.

*“बालकांना त्यांच्या भावंडांसोबत सुट्टीचा आनंद घेण्याचा अधिकार नाही का?”* असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बालकांच्या मानसिक आरोग्यामध्ये कुटुंबासोबत वेळ, खेळ, सामाजिक संवाद आणि आनंदी अनुभव यांचाही समावेश असतो. त्यामुळे उन्हाळी विश्रांतीचा प्रश्न बालहक्कांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षभरात किमान ३०० दिवस पूरक पोषण आहार देणे बंधनकारक असल्याने अंगणवाड्या पूर्णपणे बंद ठेवणे प्रशासनासाठी शक्य नसल्याचे वास्तव आहे. अंगणवाडी ही केवळ पूर्वप्राथमिक शिक्षणाची व्यवस्था नसून पोषण, आरोग्य आणि बालविकासाशी निगडित महत्त्वाची योजना आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पर्यायी उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सौ आशाताई ढाकणे यांनी सुचविले की, प्राथमिक शाळांप्रमाणे अंगणवाडीतील बालकांनाही मर्यादित उन्हाळी सुट्टी देण्याबाबत सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच, उन्हाळी कालावधीत तीन ते सहा वयोगटातील बालकांनाही ‘टेक होम रेशन’ च्या माध्यमातून घरीच पूरक पोषण आहार उपलब्ध करून देता येऊ शकतो.

“एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केवळ प्रशासनिक योजना नसून सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे उपस्थितीपेक्षा बालकांचे हित केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. सुरक्षित वातावरण, आरोग्य, विश्रांती, खेळ, भावनिक स्थैर्य आणि कुटुंबासोबत वेळ हे देखील बालविकासाचे महत्त्वाचे घटक आहेत,” असेही त्यांनी म्हटले.

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी व्यवस्थेकडे केवळ नियमांच्या चौकटीतून नव्हे, तर संवेदनशीलतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मतही यावेळी आशाताई ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!