केज ( प्रतिनिधी):
स्वतःला केजचा ‘डॉन’ म्हणवून घेत धारदार शस्त्राचा धाक दाखवणाऱ्या एका दुचाकी चोराला नागरिकांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून रंगेहात पकडले. केज-बीड मुख्य रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ‘जुबेर उर्फ मारी’ असे या अटक करण्यात आलेल्या कथित डॉनचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
एकुरका येथील रहिवासी बाळासाहेब निवृत्ती ठोंबरे हे कामानिमित्त केजला आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल (क्रमांक MH-44/Y-7379) केज-बीड मुख्य रस्त्यावरील कीर्ती जनरल स्टोअर्ससमोर उभी केली होती. काही वेळात ते परत आले असता, एका अज्ञात इसमाने गाडीचे लॉक तोडून ती चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
’तुझे खल्लास कर दुंगा’ म्हणत धारदार शस्त्राचा धाक
ठोंबरे यांनी तात्काळ सावध होऊन पाठलाग करत चोरट्याला पकडले. यावेळी पकडले गेल्याचे लक्षात येताच चोरट्याने खिशातून धारदार शस्त्र काढून फिल्मी संवादांचा वापर करत धमकावण्यास सुरुवात केली. “तु मुझे पहेचानता नही क्या? मैं केज का बहोत बडा डॉन हु! मेरा नाम जुबेर उर्फ मारी है, तुझे मैं खल्लास कर दुंगा!” अशी शिवीगाळ करत त्याने ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
नागरिकांनी आवळल्या मुसक्या
ठोंबरे यांच्या आरडाओरडीमुळे आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. गर्दी जमा होत असल्याचे पाहून आरोपीने मोटारसायकल सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सजग नागरिकांनी आणि ठोंबरे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी गजाआड
या प्रकरणी बाळासाहेब ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी जुबेर उर्फ मारी याच्याविरोधात गु.र.नं. ५६२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण (DB) पथकाचे उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि अमिरोद्दीन इनामदार यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.











