नांदेड़ प्रतिनिधि: समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या BEHUMANS WELFARE FOUNDATIONच्या वतीने ‘छत्री वाटप उपक्रम २०२६’ हा पहिला सामाजिक उपक्रम हैदराबाद येथील बरकतपुरा परिसरात उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत परिसरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात विद्यार्थिनींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांना पावसापासून संरक्षण मिळावे, या सामाजिक हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी श्री. एन. बी. कुलकर्णी यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ छत्र्यांची देणगी दिली. त्यांच्या या सामाजिक योगदानातून मिळालेल्या छत्र्यांचे वाटप BEHUMANS WELFARE FOUNDATIONच्या माध्यमातून करण्यात आले.
छत्री वाटप कार्यक्रमास श्री. एन. बी. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता कुलकर्णी यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी BEHUMANS WELFARE FOUNDATIONच्या डायरेक्टर माधुरी गजानन बिडकर, गौरव गजानन बिडकर तसेच फाउंडेशनचे फाउंडर तथा CEO गजानन गंगाधरराव बिडकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना फाउंडेशनचे फाउंडर तथा CEO गजानन गंगाधरराव बिडकर यांनी सांगितले की, हा फाउंडेशनचा पहिला सामाजिक उपक्रम आहे. सुरुवातीचा हा उपक्रम कदाचित छोट्या स्वरूपाचा असेल; मात्र भविष्यात फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा विस्तार करण्याचा मानस आहे. समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येक वेळी मोठ्या मदतीची आवश्यकता नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटीशी मदत एकत्र आली तर त्यातून मोठा सामाजिक बदल घडवून आणता येतो. त्यामुळे समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी फाउंडेशनच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या सर्व एक्झिक्यूटिव्ह मेंबर्स तसेच सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. नियोजनापासून प्रत्यक्ष छत्री वाटपापर्यंत सर्व सदस्यांनी जबाबदारीने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
BEHUMANS WELFARE FOUNDATIONच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“तुमच्या एका छोट्याशा मदतीने आपण एक मोठा बदल घडवू शकतो. चला एकत्र येऊया आणि माणुसकी जपूया,” हा संदेश देत फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. “BE HUMANS, BE HONEST” हा संस्थेचा विचार घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.











