बीड:
जिल्ह्यातील नागरिक, दिव्यांग बालके आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक ‘दिव्यांग पार्क’ आणि आधुनिक ‘ट्रॅफिक पार्क’ उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्यासमोर करण्यात आले असून, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दिव्यांग बालकांसाठी उपचार व मनोरंजनाचा संगम
प्रस्तावित दिव्यांग पार्कमध्ये केवळ मनोरंजनाची खेळणी न ठेवता, दिव्यांग मुलांच्या शारीरिक व मानसिक पुनर्वसनासाठी उपयुक्त थेरपी साधने, सेन्सरी खेळणी आणि व्हीलचेअर-सुलभ रॅम्प्सची रचना केली जाणार आहे. हे उद्यान दिव्यांग मुलांसाठी आनंदासोबतच उपचारात्मक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल, यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रात्यक्षिकातून वाहतूक शिस्तीचे धडे
शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावेत, यासाठी अत्याधुनिक ‘ट्रॅफिक पार्क’ विकसित केले जाईल. यात मिनी रोड नेटवर्क, ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि रोड साईन बोर्ड्सचा समावेश असेल. तसेच, या उद्यानाच्या दीर्घकालीन देखभाल व व्यवस्थापनासाठी काही व्यवसायाभिमुख उपक्रम जोडून प्रकल्प शाश्वत (Self-sustainable) करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
समावेशकता, नागरी सुरक्षा आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम घडवणारे हे दोन्ही प्रकल्प बीड शहराच्या वैभवात आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भर घालणारे ठरणार आहेत.










