“आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना मीडियातील आरक्षित जागा का दिसत नाही?” – सुजात आंबेडकरांचा संतप्त सवाल
विशेष प्रतिनिधी | मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी देशातील तथाकथित ‘आरक्षण आणि मेरिट’च्या चर्चेवर जोरदार निशाणा साधला आहे. “अमित ठाकरे यांच्यापेक्षा आमच्या आंबेडकरवादी आणि बहुजन चळवळीतील सामान्य कार्यकर्ता अधिक निर्भीड, स्पष्ट आणि प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो. फरक एवढाच आहे की, चळवळीतील मुलांकडे प्रचंड मेरिट असतानाही मुख्य प्रवाहातील मीडिया स्पेस ही काही ठराविक लोकांसाठीच ‘आरक्षित’ (Reserved) असते,” अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमे आणि मेरिटच्या नावाखाली टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
सुजात आंबेडकर यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपली ही सडेतोड भूमिका मांडली.
चळवळीतील मुलांकडे स्वतःचे आकलन, त्यांना भाषणाची स्क्रिप्ट लागत नाही
आपल्या पोस्टमध्ये सुजात आंबेडकर म्हणाले, “मी कोणाची खिल्ली उडवत नाही, पण आज देशभरात आरक्षण आणि मेरिटवर ज्या प्रकारे बोलले जात आहे, त्या पार्श्वभूमीवर हे बोलणे गरजेचे आहे. गाव-खेड्यात, गल्लीबोळात आंबेडकरवादी चळवळीचे कार्यक्रम राबवणारा कार्यकर्ता सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध परखड मत मांडतो. बहुजन, आदिवासी, कामगार आणि डाव्या चळवळीतील विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी कोणी भाषण लिहून देण्याची गरज पडत नाही. सीजेपी (CJP) आंदोलनातील मुलांनी ज्या पद्धतीने सरकारला जाब विचारला, ते चित्र अमित ठाकरेंपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रभावी होते.”
मेनस्ट्रीम मीडियाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप
मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या आणि माध्यमांच्या पक्षपाती भूमिकेवर बोट ठेवताना ते म्हणाले:
”तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया अपयशी ठरलेली किंवा विसरलेली भाषणे कव्हर करतो आणि त्यांना अवाजवी महत्त्व देतो. परंतु, यापेक्षा कित्येक पटीने सक्षम आणि अभ्यासू असलेल्या आंदोलनातील तरुणांना दाखवण्याची हिंमत हा मीडिया का दाखवत नाही? चळवळीतील कार्यकर्त्यांच्या गुणवत्तेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही.”
सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक चळवळींमध्ये ‘आरक्षण, Merit आणि मीडियातील प्रतिनिधित्व’ या विषयावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.












