पोलिस प्रशासन न्यूज.

हरेगाव जलजीवन मिशन प्रकरणावरून संघर्ष तीव्र कारवाई न झाल्यास ३ ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा


अहिल्यानगर (अहमदनगर)|प्रतिनिधी, (सुनिल वाघमारे ):

हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेतील कथित गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम विक्रम चित्ते यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली असून, ३ ऑगस्ट २०२६ पासून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

१४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

डॉ. चित्ते यांनी १४ जुलै २०२६ रोजी हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा तसेच संबंधित अधिकारी, ठेकेदार व जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करणारी लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली होती.

या तक्रारीमध्ये प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी, कामांचे तांत्रिक ऑडिट तसेच चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, तक्रार दाखल करून कालावधी उलटूनही अपेक्षित स्वरूपाची चौकशी किंवा ठोस कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असा दावा डॉ. चित्ते यांनी केला आहे.

चौकशी प्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप

दरम्यान, चौकशी प्रक्रियेत काही माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हस्तक्षेप करत असल्याचा तसेच संबंधितांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होण्यासाठी संबंधित व्यक्तींना चौकशी प्रक्रियेवर कोणताही प्रभाव टाकता येऊ नये, तसेच चौकशीत अडथळा निर्माण होत असल्यास प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘निष्पक्ष चौकशी करा, अन्यथा आंदोलन’

जलजीवन मिशन प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि चौकशीत अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. चित्ते यांनी केली आहे.

प्रशासनाकडून याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ पासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेशी संबंधित आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करते का आणि संबंधित तक्रारीवर कोणती कार्यवाही करते, याकडे श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!