पोलिस प्रशासन न्यूज.

शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी: बीड जिल्ह्यात महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’


बीड,प्रतिनीधी :

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि प्रशासकीय सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या अभियानाची घोषणा करण्यात आली असून, प्रशासनाने अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

​या अभियानांतर्गत तालुका स्तरावर ‘सेवा सेतू’ शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, ‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांचे अर्ज व कागदपत्रांची पडताळणी जागीच पूर्ण केली जाईल.

​अभियानातील प्रमुख सेवा व योजना:

​महसूल व भूमी अभिलेख: प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे, वन हक्क दावे मंजुरी आणि खरेदी-विक्री व्यवहार मोजणीशी जोडणे.

​नागरी सुविधा: नवीन नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद आणि प्रलंबित घरगुती वीज जोडणी.

​दाखले व प्रमाणपत्रे: नॉन-क्रीमीलेअर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार सेवा आणि शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग लायसन्स).

​कृषी व कल्याणकारी योजना: मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (सिंचन विहीर नोंदणी), शिधापत्रिका वाटप आणि महिला बचत गट नोंदणी.

​याशिवाय ‘सेवा माझे योगदान’ मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान, विकसित भारत संकल्प यात्रा, अंगणवाडी उत्सव आणि लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करणे यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत.

​प्रशासनाचे आवाहन:

प्रशासकीय सेवा थेट दारापर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत लाभ देणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील नागरिकांनी शिबिरांना येताना आवश्यक ती मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सोबत आणून या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!