केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील उमरी (फाटा) टोल नाक्यावर स्थानिक चारचाकी वाहने व शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अन्यायकारक पद्धतीने टोल वसूल केला जात असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटना, बीड जिल्हा यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात संघटनेने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, केज यांना निवेदन सादर केले असून, मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता उमरी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
निवेदनानुसार, केज–मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील HPM कंपनीच्या टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरातील स्थानिक वाहनांना टोलमुक्ती देण्याची तरतूद असतानाही स्थानिक नागरिक, शेतकरी व शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून वारंवार टोल आकारला जात आहे. त्यामुळे स्थानिकांवर आर्थिक अन्याय होत असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित कंपनीला योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, शेतकरी दिवसभरात अनेक वेळा टोल नाका ओलांडत असल्याने प्रत्येकवेळी टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे स्थानिक वाहनधारक आणि शेतकऱ्यांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुलदीप करपे करणार असून, मा. रविकांत (भाऊ) तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार असल्याचे पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. संघटनेने परिसरातील शेतकरी, वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे केज तसेच HPM कंपनीच्या व्यवस्थापकांना देण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक वाहनांना टोलमुक्तीबाबत प्रशासन व टोल व्यवस्थापनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता केज तालुक्यासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
— लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज












