पोलिस प्रशासन न्यूज.

जिल्हा बाल संरक्षण कक्षातील रिक्तपदांमुळे बीड जिल्ह्यातील बालकांच्या हक्कांची पायमल्ली,सहा वर्षां पासून जे.जे.अॕक्ट नुसार पदभरतीच नाही शासनाने तातडीने कार्यवाही करावी – बाजीराव ढाकणे


बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम (जे.जे. अॕक्ट)अंतर्गत आवश्यक पदभरती गेल्या सहा वर्षांपासून झालेली नसल्याने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची खंत लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केली आहे.त्यांनी

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की,जिल्हा बाल संरक्षण कक्ष हा अनाथ,निराधार, बेवारस,अत्याचारग्रस्त, बालमजुरीत अडकलेली, बालविवाहाच्या धोक्यात असलेली तसेच इतर संकटग्रस्त बालकांच्या संरक्षण व पुनर्वसनासाठी कार्य करणारी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. मात्र या कक्षातील विविध पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने बाल संरक्षणाशी संबंधित कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.

बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, बालगृहे,स्पॉन्सरशिप, फोस्टर केअर,दत्तक प्रक्रिया तसेच पुनर्वसनाशी संबंधित विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून अनेक प्रकरणांच्या निपटाऱ्यास विलंब होत आहे.परिणामी, गरजू बालकांना वेळेत संरक्षण,समुपदेशन, पुनर्वसन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे बाजीराव ढाकणे यांनी नमूद केले.बालकांच्या हिताशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न असून महिला व बाल विकास विभागाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व रिक्त पदे नियमित पद्धतीने भरून ही यंत्रणा सक्षम करावी, तसेच प्रत्येक गरजू बालकाला कायद्याने अपेक्षित संरक्षण व न्याय मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.बालकांचे संरक्षण ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असून बाल हक्कांशी संबंधित पदे वर्षानुवर्षे रिक्त ठेवणे हे दुर्दैवी असल्याचेसांगत शासनाने तातडीने पदभरती प्रक्रिया राबवावी,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!