पोलिस प्रशासन न्यूज.

*वाचनातून ज्ञानाचा प्रकाश; जीवनातील अंधार नष्ट करतो..* (वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 46 व्या केंद्राचे एकलव्य नगर येथे उद्घाटन)


बीड (प्रतिनिधी) माऱ्याच्या- मोक्याच्या जागा मिळवा; त्याकरिता उच्च शिक्षणाची कास धरून ग्रंथाशी संगत ठेवून सखोल वाचन, चिंतन,मनन करून ज्ञान प्राप्त करा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा बहुमोल उपदेश लक्षात ठेवून लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून लोकशाही तत्त्वाचा प्रचार आणि समर्थन करण्याकरिता वाचनालयाच्या 46 व्या केंद्राचे उद्घाटन माननीय प्रभू पवार यांच्या अध्यक्षतेखाली,मा प्रा. श्रीराम जाधव, मा.श्री संतोष बर्डे यांच्या उपस्थितीत एकलव्य नगर, (भिल्ल समाज वस्ती) आहेर धानोरा ता. जि. बीड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ह्याप्रसंगी एकलव्य नगर परिसरातील परिवर्तनवादी जेष्ठ नागरिक माननीय प्रभू पवार अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्रीराम जाधव से.नी. जिल्हा प्रबंधक एलआयसी यु एस वाघमारे प्रा. टी.जी कांबळे, पोस्टमास्टर अमरसिंह ढाका, शिक्षक संतोष बर्डे, आयुष्यमान प्रतिभाताई रोडे, मा. प्रकाश फाटक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते,तर आयुष्यमान काशिनाथ वाघमारे , संविधान युवा मंचचे अध्यक्ष ॲड राजेश शिंदे , बीड विधानसभा मतदारसंघ बसपा चे अध्यक्ष रजनीकांत वाघमारे,निखिल वडमारे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ आठवले यांनी केले तर वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी वानखेडे यांनी प्रास्ताविक करून वाचनालयाच्या उपक्रमाबद्दल व महामानव अभिवादन ग्रुप राबवीत असलेल्या विविध समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्प माला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून त्यांच्या विचारांना व महान कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले.

विद्यार्थी व पालकांशी हितगुज साधताना आपल्या प्रबोधनात्मक भाषणातून प्राध्यापक श्रीराम जाधव म्हणाले की जीवनात आहे त्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर उच्च शिक्षणाची कास धरून आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेत आपले हक्क संविधानानिक मार्गाने कसे मिळवायचे हे समजून घेणे व त्याकरिता कायद्याचे पालन करून लढा देणे गरजेचे आहे. तत्कालीन ब्रिटिश शासनाने 1871 मध्ये गुन्हेगारी जमात कायदा केला होता तो कायदा 31 ऑगस्ट 1952 रोजी भारतीय लोकशाही संविधानिक मार्गाने रद्द केला. या जुलमी कायद्यांमुळे मूळ रहिवासी असलेले आदिवासी, भिल्ल, पारधी,रामोशी,विमुक्त भटक्या जाती जमाती मधील मानवाचे जीवन दुःखमय व हालाखीचे होते. याबद्दल सविस्तर विवेचन केले. *”शिका संघटित व्हा व संघर्ष करा”* ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपदेशानुसार विपरीत परिस्थितीत राहूनही उच्चशिक्षण घेऊन स्वहिता बरोबर समाजाची ऋण फेडा परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करा असे प्रतिपादन प्रकाश फाटक यांनी केले. ऍड राजेश शिंदे यांनी देखील स्पष्ट केले की माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायचे असेल तर आणि जीवनात परिवर्तन करावयाचे असेल तर शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या व क्रांतिवीर बिरसा मुंडा या महान महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले आचरण ठेवावे हे अगत्यपूर्वक सांगितले. अमरसिंह ढाका आपल्या मनोगतात म्हणाले की गुन्हेगारी जमात कायद्याने पोळलेल्या व सर्व स्तरातील मानवाने अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी -परंपरा व बालविवाह न करणे दारू मादक पदार्थ तंबाखू बिडी सिगरेट यापासून दूर राहणे व समाजाच्या प्रगती करिता हे समजावून सांगितले. शिक्षक संतोष बर्डे यांनी आपल्या भिल्ल बांधव बोलीभाषेत बोलून भिल्ल समाजातील पहिले आय.ए.एस होऊन जिल्हाअधिकारी झालेले डॉ राजेंद्र भारुड यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखवला तर प्रत्येकाने बघितलेले मोठे स्वप्न देखील पूर्ण करता येते त्याकरिता पालकांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये असे आग्रही प्रतिपादन केले.

वाचाल तर वाचाल तर्फे 51 पुस्तकाचा संच एकलव्य नगर वस्ती करिता माननीय प्रभू पवार व कृष्णा पवार कडे सुपूर्द केला. पुस्तक वितरणाची जबाबदारी कृष्णा पवार यांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारली. महामानव अभिवादन ग्रुप तर्फे 39 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयु. प्रतिभाताई रोडे व पी. आय.सुरेश साबळे व ए .एस.आय.अशोक सोनवणे यांनी 29 पुस्तके फिरते मोफत वाचनालयाला दान दिले. महामानव अभिवादन ग्रुप करिता रोडे ताईंनी 20 पेन व 18 वह्या दान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षीय समारोपात या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे प्रभू पवार यांनी एकलव्य नगरा तर्फे लहान बालकांच्या हिताकरिता जाहीर केले की संपूर्ण समाज अंधश्रद्धा, दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट त्यापासून दूर राहण्यास व आदर्श जीवन जगण्यासाठी स्वतः शपथ घेतली व व्यसनापासून दूर राहण्याचे सर्वांच्या वतीने आश्वासन दिले.. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काशिनाथ वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास यलोपा पवार, कैलास पवार, राजू पवार, बलभीम पवार, काळू पवार,दादा पवार, बाळू पवार,सतीश पवार,दीपक बर्डे,अमोल बर्डे, दत्ता बर्डे, अमोल पवार, गंगाधर पवार,वैभव पवार, छबाबाई पवार, आशाबाई पवार,सुरेखा पवार,जया पवार, सुमन बर्डे,मकाबाई बर्डे,इमलबाई बर्डे व परिसरातील बहुसंख्य महिला, पुरुष व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!