पोलिस प्रशासन न्यूज.

सुख-शांतीचा मार्ग ‘सम्यक’ असावा, मार्ग चुकला की दुःख निश्चित; केजमध्ये धम्मप्रवचनात ॲड. बी. बी. धन्वे यांचे मार्गदर्शन


केज (प्रतिनीधी):

भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा केज यांच्या वतीने आयोजित ‘वर्षावास निमित्त धम्मप्रवचन मालिका व ग्रंथवाचन – २०२६’ अंतर्गत ३१ व्या दिवसाचा कार्यक्रम काल (शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट) अत्यंत भाविक आणि उत्साही वातावरणात पार पडला. ‘श्रावण पौर्णिमा’ या विषयावर आधारित आयोजित या धम्मप्रवचन व ग्रंथवाचन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा केज शहराध्यक्ष आयु. जयपाल मस्के यांनी भूषवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक व प्रमुख प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आयु. ॲड. बी. बी. धन्वे उपस्थित होते. त्यांनी भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानातील पायाभूत मानल्या जाणाऱ्या ‘त्रिलक्षण’ (अनित्य, दुःख आणि अनात्म) या संकल्पनांसोबतच ‘श्रावण पौर्णिमेचे धम्म इतिहासातील महत्त्व’ यावर सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले.

आपल्या धम्मप्रवचनात बोलताना ॲड. बी. बी. धन्वे म्हणाले, “श्रावण पौर्णिमा ही असत्यावर सत्याचा आणि दुर्गुणावर गुणांच्या विजयाचे प्रतीक आहे. याच पावन दिवशी तथागत बुद्धांनी हिंसक अंगुलिमालाचे हृदयपरिवर्तन करून त्याला धम्माचा मार्ग दाखवला होता. तसेच बौद्ध इतिहासामध्ये श्रावण पौर्णिमेला प्रथम धम्म संगीती आयोजित होऊन सुत्तपिटकाची निर्मिती करण्यात आली होती, जे धम्माच्या संरक्षणातील महत्त्वाचे पाऊल ठरले.”

अनित्य, अनात्म आणि दुःख या विषयावर स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले, “मानवाला आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हवे असते; परंतु ते मिळवण्याचा मार्ग ‘सम्यक’ (योग्य) असावा. मार्ग चुकला की जीवनात दुःख निर्माण होते. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असून काहीही शाश्वत नाही, हेच ‘अनित्य’ सत्य आहे. या तात्पुरत्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे ‘दुःख’ निर्माण होते. माणसाने स्वतःतील ‘मी’-पणा आणि अहंपणाचा त्याग करून ‘अनात्म’ भावाची जाणीव ठेवल्यास तो दुःखाच्या पाशातून मुक्त होऊन वास्तविक शांतता (निर्वाण) प्राप्त करू शकतो.”

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष जयपाल मस्के म्हणाले, “वर्षावासाचा हा पावन काळ आत्मचिंतन आणि धम्मज्ञानाचा अंगीकार करण्याचा काळ आहे. धम्मग्रंथांचे नियमित वाचन, मनन आणि चिंतन केल्याने मानवी जीवनाला एक योग्य आणि सन्मार्गाची दिशा मिळते. बुद्धांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसून ते दैनंदिन आयुष्यात आचरणात आणणे आवश्यक आहे. केज शहरातील सर्व धम्मबंधू आणि भगिनींनी या धम्मप्रवचन मालिकेचा लाभ घेऊन समाजात शांतता, बंधुभाव आणि नीतिमत्ता जपण्यासाठी कटिबद्ध राहावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मस्के यांनी उत्कृष्टपणे केले.

या सोहळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे कल्याण मस्के, दीपक मस्के, साहेबराव हजारे, तसेच महिला शाखेच्या सरचिटणीस सुरेखा मस्के, कुसुम मस्के, रत्नमाला मस्के, कलावती हजारे, हौसाबाई हजारे, जनाबाई मस्के, पुष्पा मस्के, मैनाबाई मस्के, शीतल लोमटे, वर्षा हजार, अंजली हजारे यांच्यासह केज शहरातील सर्व धम्मबंधू, भगिनी व उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचा शेवट सरनत्त गाथेने झाला. त्यानंतर उपस्थितांना फळवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा केजच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!