सुखापूरी.प्रतिनीधी (रामकिसनअवधूत) := अंबड तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू तरुण शुभम सूर्यकांत मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दल मध्ये निवड झाली असून या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांचा व त्यांच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.
शुभम मोताळे यांनी ४५ दिवसांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर त्यांची महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलामध्ये निवड झाली असून ५ जूनपासून मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावण्यासाठी ते रुजू होणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या शुभम यांच्या या यशामुळे बेलगाव गावासह सुखापुरी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
निवडीच्या निमित्ताने ग्रामीण पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात शुभम मोताळे यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी मदन राखुंडे, अशोक चांगले, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र मोताळे, बागवान साहेब, गणेश जाधव , रामकिसन अवधूत , नाना नागे, सोमनाथ गाडे, मुक्ताराम भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शुभम यांच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत योगदान द्यावे, असा आदर्श शुभम मोताळे यांनी घालून दिला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात आणखी युवक प्रेरणा घेऊन पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












