स्वखर्चाने विहीर खोदकाम सुरू; अवघ्या दहा फूट खोलीतच मुबलक पाणी लागल्याने गावात आनंदोत्सव*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र औचित्याला साजेसा लोकहिताचा आदर्श ठेवत मौजे धावडी येथील सरपंच सौ. आशा काशिनाथ घुले यांनी गायरान धारक शेतकऱ्यांसाठी स्वखर्चाने विहीर खोदकामास सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही गंभीर पाणीटंचाई भासत असलेल्या गायरान धारक शेतकऱ्यांची गरज ओळखून हा निस्वार्थी निर्णय घेण्यात आला आहे.
विहीर खोदकाम सुरू होताच अवघ्या दहा फूट खोलीपर्यंतच भरपूर प्रमाणात पाणी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या विहिरीमुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शेतीला नवे जीवन मिळेल, अशी भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.
कोणताही राजकीय दिखावा न करता, केवळ जनहिताचा विचार करून स्वतःच्या खर्चातून सुरू केलेले हे काम सरपंच सौ. आशा काशिनाथ घुले यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण ठरत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गावात विकासाची नवी आशा निर्माण झाली असून सर्व स्तरांतून सरपंचांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
या विहिरीमुळे गायरान धारक शेतकऱ्यांची पाण्याची दीर्घकालीन समस्या सुटणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.













