नांदेड: ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड शहरात भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांनी जोरदार टीका करत आरक्षणावर आलेल्या संकटाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजाचे लोक या मोर्चात सहभागी झाले होते. खाजगीकरणामुळे आरक्षण संपुष्टात :ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणावर आलेल्या संकटावर नेमके बोट ठेवले.शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संपले: त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण आणि नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जात असल्याने शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संपुष्टात आले आहे. आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच (ग्रामपंचायत, नगरपालिका इ.) आरक्षण शिल्लक राहिले आहे. ’धर्म नव्हे, आरक्षण धोक्यात’: भाजपवर घणाघाती टीका करताना त्यांनी म्हटले, “भाजप म्हणत आहे धर्म संकटात आहे, पण ओबीसींनी समजून घ्यावे, धर्म संकटात नाही तर ओबीसींचे आरक्षण संकटात आहे.”मंडल क्रांतीची आठवण: त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाचा दाखला दिला आणि १९९० मध्ये व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या, ज्यामुळे आरक्षणविरोधी शक्ती थरथर कापल्या होत्या, त्याची आठवण करून दिली. भाजपने पाठीत खंजीर खुपसला ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. खंजीर खुपसल्याची टीका: त्यांनी ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पाचे उदाहरण देत, बहुसंख्य ओबीसी जो बाहुबली आहे, त्याच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला अशी टीका केली.शत्रू ओळखा: ओबीसी समाजाला आपले राजकीय शत्रू भाजप, महायुती आणि प्रस्थापित पक्ष आहेत, हे ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासह हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. या एल्गार महामोर्चाद्वारे ओबीसी समाजाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा आणि आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.













