केज प्रतिनीधी :
नियतीचा अत्यंत क्रूर खेळ बीड जिल्ह्यातील केज शहरात पाहायला मिळाला आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सयद कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मुलीचे प्राण वाचवून स्वतःचा जीव गमावलेल्या तरुण पित्यानंतर, आता त्याच्या वृद्धापकाळात असलेल्या वडिलांचाही मदतीची मागणी करण्यासाठी गेलेले असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण केज शहरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
पहा या घटनेचा सविस्तर घटनाक्रम:
पहिली दुर्दैवी घटना: लेकीला वाचवताना पित्याचा अंत (१० मे)
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० मे रोजी केज येथील रहिवासी रसूल गफूर सय्यद यांची नात आफ्शा सय्यद ही धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पाहण्यासाठी गेली होती. तिथे तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. स्वतःला पोहता येत नसतानाही, आपल्या पोटच्या लेकीचे प्राण वाचवण्यासाठी तिचे वडील अहेमद रसूल सय्यद यांनी कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. त्यांनी मुलीला सुखरूप बाहेर काढले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गाळात फसल्याने अहेमद सयद यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
दुसरी दुर्दैवी घटना: मदतीसाठी गेलेल्या वडिलांचा जागेवरच मृत्यू (२९ मे)
तरुण मुलाच्या जाण्याने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. याच दरम्यान, दि. २९ मे रोजी शिवसेनेच्या ‘शिवसंवाद मेळाव्या’निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार भरत गोगावले हे केज शहरात आले होते.
दिवंगत अहेमद यांच्या कुटुंबाला शासकीय आपत्कालीन योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी अहेमद यांची पत्नी, मुले आणि त्यांचे वृद्ध वडील रसूल गफूर सय्यद हे निवेदन देण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी गेले होते. मात्र, तिथे प्रचंड ऊन आणि गर्दी असल्यामुळे रसूल सय्यद यांना अचानक दरदरून घाम सुटला आणि प्रचंड घाबरल्यासारखे होऊ लागले.
तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच असलेल्या डॉ. बाबासाहेब अस्वले यांच्या ‘विघ्नहर्ता हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रसूल सय्यद यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून तातडीने सांत्वन आणि मदतीचे आश्वासन
या भीषण आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ सय्यद कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी आघाता बद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
अवघ्या १८ दिवसांत घरातील दोन्ही कमावते पुरुष गेल्यामुळे सय्यद कुटुंब आता
पूर्णपणे हतबल झाले असून, प्रशासनाने आणि समाजाने या कुटुंबाला आधार देण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.











