पोलिस प्रशासन न्यूज.

भ्रष्टाचार उघड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास खंडणीची ऑफर; जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे बीड हादरले


धमकी, दमदाटी व दहशतीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

बीड | प्रतिनिधी

नगर परिषद बीड येथील कथित भ्रष्टाचार प्रकरण उघड करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अक्षय भाई कोकाटे यांना खंडणीची ऑफर देत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धमकी, दमदाटी व दहशत निर्माण करण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आल्याने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अक्षय कोकाटे यांनी पोलीस अधीक्षक बीड व पेठ बीड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 26 मे 2026 रोजी अक्षय कोकाटे यांनी नगर परिषद बीड येथील कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचारासंदर्भात लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनात नगर परिषद बीडचे सहा-लेखापाल गणेश तुळशीराम पगारे यांच्याविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. 27 मे रोजी कोकाटे यांच्या मोबाईलवर धमकीजनक व संशयास्पद संदेश येण्यास सुरुवात झाली. “तुला पंधरा लाख पाहिजेत का”, “तुला चांगलं हातात देतो”, “फोन उचल”, “कानात बीड दिसती का तुला” अशा प्रकारचे संदेश पाठवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच सतत फोन करून मानसिक दबाव निर्माण करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दि. 27 मे रोजी रात्री अंदाजे 8 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक भरत कांबळे यांच्या कार्यालयात अक्षय कोकाटे तक्रार अर्ज तयार करत असताना गणेश पगारे व मुन्ना गायकवाड हे तेथे आल्याचा आरोप आहे. त्यावेळी कार्यालयाबाहेर उभे राहून “कुठं आहे तो अक्षय कोकाटे, त्याला बाहेर काढा… दाखवतो त्याला…” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेत थेट जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यालाच अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याने शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. “भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच जर दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात खंडणीचा प्रयत्न, धमकी, दमदाटी, मानसिक त्रास, शिवीगाळ व जीवितास धोका निर्माण करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसेच सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.


79
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!