परळी वैजनाथ प्रतिनिधी :
मराठा समाजासाठी मराठा भवन उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून नगरपरिषदेसमोर सातत्याने आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व मराठा बांधवांचे प्रथम आभार मानले जात असतानाच, आता मराठा भवनासाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते व मराठा बांधवांनी या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून काही भूमाफिया व राजकीय मंडळी स्वतःचे हित साधत आहेत,” असा आरोप माजी नगराध्यक्षा दिपक देशमुख यानी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी नगरपरिषदेकडून मराठा भवनासाठी इंडस्ट्रीज एरियामधील ओपन स्पेस, काळे हॉस्पिटल शेजारील जागा तसेच ब्रह्मवाडी शिवारातील सुमारे चार एकर जागा ठरावासह देण्यात आली होती. मात्र त्या जागांचा स्वीकार का करण्यात आला नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, आता वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागे, स्मशानभूमी लगत असलेल्या दत्त मंदिर देवस्थानच्या जमिनीबाबत कोणताही अधिकृत नगरपरिषद ठराव नसताना फक्त पत्र देऊन चतुःसीमा निश्चित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जागेचा सर्वे नंबर काय? तो जाहीर करावा तसेच, स्थानिक आमदारांनी घेतलेल्या बैठकीत “नाथ प्रतिष्ठानने ही जागा दिली” असे सांगण्यात आल्याने नवीन चर्चांना उधाण आले आहे.
काही मराठा बांधवांनी सवाल उपस्थित केला आहे की, देवस्थानची जमीन शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कायदेशीररित्या हस्तांतरित किंवा विक्री करता येते का? तसेच संबंधित जागा एका नगरसेवक व भूमाफियाशी संबंधित असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हायवेच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूंना ७५ मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे संबंधित जागेवर भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “ही अडचणीची जागा नाथ प्रतिष्ठानमार्फत मराठा समाजाच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामागे राजकीय वर्चस्व वाढवण्याचा हेतू आहे,” असा आरोप माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख याच्याकडून करण्यात आला.
“आंदोलन नगरपरिषदेकडे जागा मागण्यासाठी झाले होते, मग ओपन स्पेस न देता नाथ प्रतिष्ठानची जागा पुढे का आणली जात आहे?” असा सवाल उपस्थित करत काही मराठा बांधवांनी समाजाने जागृत भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे परळीतील राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














