पोलिस प्रशासन न्यूज.

लखमापूरीत हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू


सुखापूरी,(रामकिसन अवधूत) प्रतिनिधी : – अंबड तालुक्यातील लखमापूरी येथे नाफेडच्या भाव स्थिरीकरण योजना (PSS) अंतर्गत सन २०२५–२६ साठी अंबड तालुक्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत अंबड तालुक्यातील हरियाली ग्रीन व्हेज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., लखमापुरी या शेतकरी उत्पादक कंपनीला खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत सोयाबीन प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये, मूग प्रतिक्विंटल ८,७६८ रुपये व उडीद प्रतिक्विंटल ७,८०० रुपये या हमीभाव दराने खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष डॉ. श्रीहरी काळे यांनी दिली. हरियाली ग्रीन व्हेज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., लखमापुरी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरू असून खरेदी प्रक्रियाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे तसेच स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.

हमीभावाने शेतमाल विक्रीची ही संधी शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अध्यक्ष डॉ. श्रीहरी काळे यांनी केले आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!