घनसावंगी / जालना:
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, घनसावंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात नियमित हजर न राहता केवळ कागदोपत्री कामे दाखवून मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वडीरामसगाव येथील शेतकरी भागवत अंबादास वाघमारे यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ वनअधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, घनसावंगी सामाजिक वनीकरण कार्यालयामार्फत शेतकरी व शेतीशी संबंधित विविध शासकीय योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि कागदपत्रे/फाईल सादर करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, कार्यालयात जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
कागदोपत्री बोगस कामांचा संशय
कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत असल्याने तालुक्यात होणारी कामे केवळ कागदावरच मर्यादित राहून पूर्णतः बोगस पद्धतीने केली जात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर शेतकऱ्याने योजनेची अंमलबजावणी केली आहे किंवा नाही याची कोणतीही प्रत्यक्ष पाहणी अथवा शहानिशा न करता, केवळ आर्थिक देवाणघेवाण करून लाभाचे वाटप केले जात असल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
वरिष्ठांकडे दाद
या गैरव्यवहाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करण्यात यावी, यासाठी या निवेदनाच्या प्रती छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त तसेच जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर काय कारवाई होते, याकडे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले
आहे.











