माजलगांव (प्रतिनिधी) :-माजलगांव तालुक्यातील महातपुरी शिवारात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारासशॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी श्री. आश्रुबा लोखंडे यांच्या शेतातील दोन एकर उभा ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षभर मेहनत करून जोपासलेला ऊस डोळ्यादेखत जळाल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतातील विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने उसाच्या शेताला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन एकर क्षेत्रातील उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या आगीत श्री. आश्रुबा लोखंडे यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने घटनास्थळी पाहणी करून शॉर्ट सर्किटचे नेमके कारण स्पष्ट करावे, तसेच प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वर्षभर कष्ट करून उभे केलेले दोन एकर ऊस पीक आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.











