केज | प्रतिनिधी
केज शहराच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला आता मोठी चालना मिळाली असून, शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ११७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या पार्श्वभूमीवर केज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सीताबाई बनसोड व हरूणभाई इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह योजनेसाठी सहकार्य करणारे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांचे आभार मानले.
नगराध्यक्ष सीताबाई बनसोड व हरूणभाई इनामदार यांनी सांगितले की, केज शहराचा पाणीप्रश्न हा केवळ आजचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारी गंभीर समस्या आहे. सत्तेत आल्यानंतर उपलब्ध असलेल्या जुन्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करण्यात आला. सुरुवातीला सुमारे ३५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित होती; मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या, पाण्याची गरज, अंतर्गत पाइपलाइन, जलसाठवण क्षमता, वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करून या योजनेत आवश्यक बदल करण्यात आले.
जुन्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून योजनेत बदल
सुरुवातीच्या प्रस्तावात केवळ मर्यादित क्षमतेचा विचार करण्यात आला होता. मात्र भविष्यात केज शहराची वाढ लक्षात घेता अधिक क्षमतेची आणि दीर्घकालीन उपयोगाची योजना असणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करून प्रस्तावात अनेक सुधारणा करण्यात आल्या.
या प्रक्रियेत प्रस्तावाची किंमत टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि अखेर ११७ कोटी रुपयांचा परिपूर्ण पाणीपुरवठा प्रकल्प तयार करण्यात आला. या योजनेत पाण्याच्या टाक्या, नवीन पाइपलाइन, पंपिंग व्यवस्था, वीजपुरवठा, सौरऊर्जा यांसारख्या विविध बाबींचा समावेश करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
२२ लाख लिटरहून अधिक क्षमतेच्या जलकुंभांचा समावेश
नवीन योजनेमध्ये शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या क्षमतेच्या जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. धारूर रोड, कचरा डेपो परिसर, कळंब रोडवरील उंच भाग तसेच शहरातील मध्यवर्ती भाग अशा विविध ठिकाणी जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले आहेत.
सध्या केज शहराची पाण्याची गरज मोठी असताना उपलब्ध जलसाठा आणि वितरण व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन योजनेमुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता
तांत्रिक मान्यता मिळणे हा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. आता पुढील टप्प्यात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
संपूर्ण योजना कार्यान्वित होण्यासाठी सुमारे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत नागरिकांना पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून बोअरवेल, नवीन पंप, तात्पुरती पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर पर्यायी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
वीजबिलाचा प्रश्नही विचारात
पाणीपुरवठा योजना उभी केल्यानंतर भविष्यात वीजबिलाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीही प्रस्तावात तरतूद करण्यात आली आहे. योजनेमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असून, पंपिंगसाठी आवश्यक वीजव्यवस्थेचा विचार करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास १६ कोटी रुपयांची तरतूद वीज व संबंधित व्यवस्थेसाठी करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
स्वर्गीय अजितदादांच्या प्रयत्नांची आठवण
या योजनेच्या मंजुरीसाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण नगराध्यक्षांनी यावेळी करून दिली. पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शेवटच्या काळातही पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेत सातत्याने सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.
केजच्या पाणीप्रश्नासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करून अखेर ११७ कोटी रुपयांच्या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाल्याबद्दल सुनेत्राताई पवार यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन
केज शहराच्या विकासासाठी कोणताही पक्षीय भेद न ठेवता सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांचे सहकार्य घेण्याची भूमिका हरूण भाई यांनी व्यक्त केली.
यासाठी रमेश आडसकर , रजनीताई पाटील, आमदार नमिताताई मुंदडा, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. नगरसेवक मंडळानेही प्रस्तावाच्या पाठपुराव्यात सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.
पारदर्शक कारभाराचा दावा
यावेळी हरून भाई यांनी पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. नगर परिषदेच्या कामकाजात भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही, अशी भूमिका मांडत, शहराच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
“जनतेने आम्हाला सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास कायम ठेवणे आणि विकासाची कामे पारदर्शकपणे पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार बांधवांचेही केले कौतुक
केजच्या विकासकामांमध्ये पत्रकारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचे काम केले असून, पत्रकार हे समाजाचा ‘तिसरा डोळा’ असल्याचे सांगत हरून भाई इनामदार यांनी पत्रकार बांधवांचे आभार मानले.
पत्रकारांनी सकारात्मक कामाची दखल घेत विविध सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान केल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. वस्तुस्थितीवर आधारित पत्रकारिता करून शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकारांचे त्यांनी विशेष आभार मानले.
“केजकरांच्या आशीर्वादाने योजना पूर्ण करू”
११७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता मिळणे हा केज शहरासाठी ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत, पुढील सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“तांत्रिक मान्यता मिळाली असून आता प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. केजकरांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करू,” असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
तसेच योजनेचे काम दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने देखरेख ठेवण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट काम होऊ नये, यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केजच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
केज शहराचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय असून, पाणीपुरवठ्यासोबतच शहरातील इतर मूलभूत सुविधांवरही आगामी काळात लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
“केजच्या विकासासाठी ज्या-ज्या व्यक्तींची आणि संस्थांची गरज भासेल, त्यांचे सहकार्य घेऊ. कोणताही पक्षभेद न ठेवता जनतेच्या हितासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे. केजकरांनी आम्हाला आशीर्वाद आणि सहकार्य द्यावे,” असे आवाहन नगराध्यक्ष सीताबाई बनसोड व हरूणभाई इनामदार यांनी केले.
११७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मिळालेली तांत्रिक मान्यता ही केज शहराच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने महत्वाची सुरुवात मानली जात आहे.













