पोलिस प्रशासन न्यूज.

आवादा कंपनीविरोधात मस्साजोग सरपंचांचा एल्गार; स्थानिक बेरोजगारांच्या रोजगारासाठी आज सोमवार २४ ऑगस्ट रोजी कंपनीच्या गेटवर आमरण उपोषण!


केज ( प्रतिनिधी):

मस्साजोग येथील ‘आवादा पॉवर ऊर्जा प्रकल्पा’वरून ग्रामस्थ आणि कंपनी प्रशासन पुन्हा एकदा आमनेसामने आले असून संघर्षाची ठिणगी पडली आहे. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह इतर मागण्यांसाठी मस्साजोगचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख आक्रमक झाले असून, त्यांनी २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता आवादा कंपनीच्या मुख्य गेटसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

​काय आहे नेमके प्रकरण?

संतोष देशमुख यांच्या कार्यकाळात आवादा कंपनीच्या गोडाऊनसाठी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले होते. स्थानिक रहिवासी व बेरोजगार तरुणांना रोजगार आणि कामाच्या ठेकेदारीत प्राधान्य देण्याच्या अटी-शर्तींवर ही मंजुरी देण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीचे गोडाऊन या ठिकाणी कार्यरत आहे; मात्र कंपनीकडून या अटींचे पालन होत नसल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी व सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी केला आहे. याशिवाय, कंपनीच्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असून शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.

​प्रमुख मागण्या:

​स्थानिक बेरोजगार तरुणांना आवादा कंपनीमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.

​कंपनीच्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य मिळावे.

​कंपनीच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात.

​या संदर्भात सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी २१ ऑगस्ट रोजी ‘आवादा पॉवर ऊर्जा प्रोजेक्ट प्रा. लि., युनिट मस्साजोग’ यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत.

​”स्थानिकांचा हक्काचा रोजगार स्थानिकांनाच मिळाला पाहिजे, तरुणांच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता होणाऱ्या या उपोषण आंदोलनामुळे प्रशासनासह कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधले गेले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!