केज/प्रतिनिधी
केज शहरातील लक्ष्मी नगर येथील इमारती च्या दुसऱ्या मजल्या वरील बांधकाम सुरु असतानाच,दुसऱ्या मजल्या वरून पडून २१ वर्षीय बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून,या प्रकरणी,परळी येथील एस के कन्स्ट्रक्शनच्या मालका विरुद्ध निष्काळजी पणामुळे कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा बुधवार दि. २९ जुलै रोजी केज पोलिसात नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
केज येथील बीड रोड लगत शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या लक्ष्मी नगर भागात अशोक मुंडे यांचे बांधकाम परळी येथील गुत्तेदार शेख लायक अली युनुस यांच्या एस के कन्स्ट्रक्शन बिल्डींग मटेरिअल मार्फत चालु आहे.सोमवारी या बांधकामावर परळी येथील २१ वर्षीय नवाज इब्राहिम शेख हा बांधकाम मिस्त्री काम करीत असताना
दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्या वरुन खाली पडल्यामुळे त्यांच्या छातीला,डोक्याला व चेहऱ्याला गंभीर मार लागून तो गंभीर जखमी झाला होता.
त्याच्या सोबत कामावर असलेले त्याचे सहकारी रहीम अलीम पठाण,रोशन मैनु शेख,जब्बार रज्जाक शेख या तिघांनी जखमी नवाज शेख याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या वर प्रथमोपचार करुन त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी पाठविले होते.नवाज शेख याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महा विद्यालयात उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान सोमवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बुधवार दि. २९ रोजी मयत नवाज शेख यांचे वडील इब्राहिम शेख यांच्या फिर्यादी वरून परळी येथील,एस के कन्स्ट्रक्शन बिल्डींग मटेरिअलचे मालक,व गुत्तेदार शेख लायक अली युनुस रा.बरकत नगर,परळी यांच्या विरुद्ध केज पोलीसात
गुत्तेदाराच्या निष्काळजीपणा मुळेच मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बजरंग मुंडे हे तपास करीत आहेत. त्याच्या पश्च्यात आई, वडील,भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
घराचा आधार गेला
या प्रकरणी नवाज शेखचे वडील इब्राहिम शेख यांच्याशी सपंर्क साधला असता,नवाज हा आमचा कमावता मुलगा होता.आई, वडील यांना बीपी, आणि शुगरचा त्रास आहे.दर आठवड्याला त्याचा हप्ता मिळाला की,तो न चुकता आमच्या गोळ्या, औषधे घेवून यायचा. त्याच्या जाण्यामुळे आमच्या घराचाआधार गेला असून घर उघड्यावर पडल्याची खंत त्यांनी प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली.












