समाजसेवा, मानवता आणि गरजूंच्या निःस्वार्थ सेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे जवान कमलेश कुमार यादव उर्फ ‘कमलेश रघुकुला’ यांना बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित “कम्युनिटी सपोर्ट अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले.
कमलेश कुमार यादव हे सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असून झारखंडमधील युवकांमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावरही त्यांची मोठी लोकप्रियता असून लाखो चाहते आणि अनुयायी आहेत. सैन्य सेवेसोबतच ते समाजसेवा, मानव कल्याण आणि गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत BEHUMANS WELFARE FOUNDATION ने त्यांना हा सन्मान प्रदान केला.
या सन्मान सोहळ्यास बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका माधुरी गजानन बिडकर, गौरव गजानन बिडकर, गिरीश गजानन बिडकर, फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गजानन गंगाधरराव बिडकर तसेच जयंत शर्मा उपस्थित होते.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ गजानन गंगाधरराव बिडकर यांनी सांगितले की, “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एका शूर सैनिकाचा समाजसेवेसाठी सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कमलेश कुमार यादव यांसारखे तरुण सैनिक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. ते भविष्यातही राष्ट्रसेवेसोबत मानवसेवेतही अग्रणी राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कमलेश कुमार यादव यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजसेवेचे कार्य असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले.












