पोलिस प्रशासन न्यूज.

केज विकास संघर्ष समितीच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; हनुमंत भोसले यांचे आमरण उपोषण सुरू


केज (प्रतिनीधी):

केज शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. समितीचे हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

केज शहरासाठी एसटी बस आगार सुरू करणे, बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या बीड रोडवरील साडेसात एकर जागेचा विकास करणे, छोट्या व्यापारी व टपरीधारकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून देणे, शहरातील वाढती वाहतूक व अपघातांची समस्या लक्षात घेऊन बायपास अथवा रिंगरोडचा पर्यायी मार्ग तातडीने करणे, क्रांतीनगर व सोनीजवळा रोड येथील स्मशानभूमींची दुरुस्ती तसेच पाण्याची व्यवस्था करणे, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभ नियमित करणे आणि लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी मुदतवाढ देणे, अशा प्रमुख मागण्या समितीने प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

केज हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून दोन महत्त्वाच्या महामार्गांच्या जोडणीमुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाणही गंभीर झाले आहे. त्यामुळे बायपास किंवा पर्यायी रस्त्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

दरम्यान, या मागण्यांसाठी समितीने यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा व आंदोलने केली; मात्र ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

“केज शहराच्या ज्वलंत प्रश्नांवर केवळ आश्वासने नकोत, तर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही हवी. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा निर्धार उपोषणकर्ते हनुमंत भोसले सर यांनी व्यक्त केला.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासन या प्रश्नांची कितपत दखल घेते आणि कोणती ठोस भूमिका घेतो, याकडे केज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!