बीड: नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे. निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवले जात असल्याने त्यांनी हे मोठे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
” गटबाजी आणि ‘बाजूला’ ठेवण्याची नाराजी”
बीडमध्ये सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी सुरू आहे. यापूर्वी आमदार धनंजय मुंडे यांनाही पक्षातील काही लोकप्रतिनिधींकडून टीकेचे लक्ष्य केले गेले होते. याच गटबाजीमुळे बीड नगरपालिका निवडणुकीची सूत्रे डॉ. योगेश क्षीरसागर यांना बाजूला ठेवून, कालच पंडितांच्या ‘शिवछत्र’ यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
निर्णय प्रक्रियेतून आपल्याला डावलले जात असल्याची भावना झाल्याने डॉ. क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आहे.
” फेसबुकवर बदलले प्रोफाईल, राजकीय भविष्याबद्दल उत्सुकता
राजीनामा दिल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरही बदल केले आहेत. त्यांनी आपला राजीनामा फेसबुकवर प्रसिद्ध केला असून, आता त्यांच्या फेसबुक खात्यावर फक्त काकू, जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे फोटो ठेवले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काही काळापूर्वीच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, परंतु आता विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीशी झालेला संबंध अल्पकाळातच तुटल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता डॉ. योगेश क्षीरसागर यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबद्दल बीड जिल्ह्यात उत्सुकता कायम आहे.
” राष्ट्रवादीकडून पंडितांच्या ‘शिवछत्र’ कडे सूत्रे”
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. योगेश क्षीरसागर यांना वगळून कालपासूनच नगरपालिका निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती ‘शिवछत्र’ वरून पंडितांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.
डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडून बीड विधानसभेची निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना सुमारे ९३ हजाराहून अधिक मते मिळाली होती, मात्र त्यांचा निसटता पराभव झाला होता. पराभवानंतर नगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्याकडे राहावी, अशी त्यांची अपेक्षा होती.













