बीड: आपला भारत देश बुद्धभूमी म्हणून जगात ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर, येथील धम्मदीप बुद्ध विहार, बलभीम नगर, पालवण रोड येथे पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या उपस्थितीत दुसऱ्या वर्षावास धम्मग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी भन्तेजींनी आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या धम्मदेसनेत प्रतिपादन केले की, तथागत गौतम बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रज्ञा, मैत्री, शील आणि करुणेचे तत्त्वज्ञानच जगात खरी शांती स्थापित करू शकते. भन्तेजींनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या निर्णयावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेबांनी विषमतेची वागणूक दूर करण्यासाठी आणि माणसाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली. जगातील सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून त्यांनी मानवाचे कल्याण साधणारा दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेऊन पाच लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. “डॉ. बाबासाहेब लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ केवळ वर्षावासामध्येच न वाचता, प्रत्येकाने नेहमी त्याचे वाचन करून तथागतांचा उपदेश समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन भन्तेजींनी केले. बुद्ध धम्म केवळ पूजा पाठाचा नसून, तथागतांच्या उपदेशाचे जीवनात आचरण केल्यानेच मंगल होणार आहे, असे त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पूज्य भन्तेजींच्या उपस्थितीत धम्मरॅली काढण्यात आली. आदर्शाचे पुष्प, दीप आणि धुपाने पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विहार महिला कमिटी तर्फे भन्तेजींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ‘वाचाल तर वाचाल’ या संस्थेतर्फे नियमित वाचन करणाऱ्या महिलांना भन्तेजींच्या हस्ते “त्रिसरण पंचशील हाच जीवन मार्ग” या पुस्तकांचे वितरण करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रामनेर भिक्खू धम्मबोधी, धम्मरक्षिता अनागरिका, जी.एम. भोले, डी.जी वानखेडे, ॲड राजेश शिंदे, ॲड डी एस. तांगडे, प्रशांतजी वासनिक, परमेश्वर बनकर, सुनीलजी डोंगरे यांच्यासह बलभीम नगर आणि पंचशील नगर परिसरातील बहुसंख्य उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी एम राऊत यांनी सूत्रसंचालन, ॲड तेजस वडमारे यांनी प्रास्ताविक आणि अंजली तेजस वडमारे यांनी आभार प्रदर्शन केले.सरणात्तयने आणि भोजन व खीरदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.












