बीड: येथील जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब (Cath Lab) सुरू झाल्यानंतर, पहिली हृदयरोगावरील अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया ४५ वर्षीय एका रुग्णावर मोफत करण्यात आली. यामुळे त्या गरीब रुग्णाला खासगी रुग्णालयात होणारा सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च वाचला आहे.जिल्हा रुग्णालयात हृदयविकारांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध झाल्यामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्यसेवेत क्रांती झाली आहे.या रुग्णालयात आलेल्या ४५ वर्षीय पुरुषावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी या रुग्णाची २-डी-ईको (2D-Echo) चाचणी करण्यात आली होती, यामध्ये त्याच्या हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. कॅथलॅब सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ अँजिओग्राफी (Angiography) करून उपचारांसाठी अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. कॅथलॅब सुरू झाल्यानंतर अवघ्याच काही दिवसांत ही पहिली यशस्वी अँजिओप्लास्टी पार पडली आहे.
यशस्वी पथकाची कामगिरी:
ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत, एसीएस.डाॅ.मोहम्मद मुजाहेद, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे ,यांच्यासह.रमा गिरी,संगिता महानोर,यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.सुनिता अनिल बारकुल, डॉ. सुनील बोबडे,राणी बांगर, रेखा वनवे,शितल पाटील,शरद वाघमारे, अण्णा बेलदार, तेजस पाटील, राजेश हौसारे, ओम जोगदंड, रेखा माने. आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओग्राफी: हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेज (Blockage) आहे, हे पाहण्यासाठी केलेली तपासणी.अँजिओप्लास्टी: ही एक उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी बलून (Balloon) वापरला जातो आणि नंतर तिथे ‘स्टेंट’ (Stent) बसवला जातो.या अत्याधुनिक सुविधेमुळे आता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना येथेच यशस्वीरित्या उपचार करणे शक्य झाले आहे.












