पोलिस प्रशासन न्यूज.

बीड: धम्मदीप बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा


  बीड प्रतिनिधी: शिवाजीनगर येथील धम्मदीप बुद्ध विहार येथे ॲड. तेजस वडमारे आणि बुद्ध विहार कमिटीतर्फे ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (अशोक विजया दशमी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मा. नगरसेवक विनोद जी मुळूक आणि मा. नगरसेवक विलास बाप्पा विधाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक ॲड. तेजस वडमारे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, सिद्धार्थ गौतमाने आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यानंतर सम्राट अशोकाने युद्ध सोडून बुद्ध धम्माचा स्वीकार केला, तो दिवस अश्विन शुक्ल-दशमी होता, म्हणून याला अशोक विजय दशमी म्हणतात.ॲड. वडमारे यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ऐतिहासिक अशोक विजय दशमीचे महत्व ओळखून नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह धम्मदिक्षा घेतली. या सामुदायिक धर्मांतरामुळे भारतातून लुप्त झालेल्या बुद्ध धम्माचे पुनरुत्थान झाले. या सोहळ्यालाच ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन’ असे म्हणतात.यावेळी वर्षावासानिमित्त सुरू असलेले ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन बौद्धाचार्य अंकुश चव्हाण सर यांनी केले. हे ग्रंथ वाचनाचे ८५ वे पुष्प होते.कार्यक्रमाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे सामूहिक पठण करून करण्यात आला.​या सोहळ्याला अंजली तेजस वडमारे, उर्मिला वडमारे, आशा धनवे, गौतम खेमाडे, निवृत्ती वाघमारे, नितीन लोखंडे यांच्यासह बलभीम नगर, मित्र नगर, छत्रपती शिवाजीनगर, दिलीप नगर परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!