बीड: बीड जिल्हा डेमोक्रॅटिक पार्टीची महत्त्वपूर्ण कार्यकारणी बैठक दि. १४ ऑक्टोबर रोजी हॉटेल नीलकमल येथे संपन्न झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्धार केला. या बैठकीत बोलताना पक्षाचे नेते अजिंक्य चांदणे यांनी राजकारण आणि चळवळ यांतील मूलभूत फरक स्पष्ट केला. “राजकारणात लवचिकता असते तर चळवळीत विद्रोह असतो. राजकारण डावपेचावर आधारित असले तरी चळवळ तत्त्व आणि विचारांवर आधारित असते,” असे मत त्यांनी मांडले. चळवळीतील कार्यकर्ता राजकारणात यशस्वी होण्याची फार कमी उदाहरणे असताना, चळवळीतील कार्यकर्त्याला राजकारणात यश मिळवायचे असेल तर स्वाभिमानासोबतच लवचिकता आणि नम्रताही फार महत्त्वाची असते, असा मोलाचा सल्ला चांदणे यांनी दिला. निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार: समोर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निश्चय केला. विशेषतः, बीड नगरपालिकेची जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे ही निवडणूक पक्षाने ताकतीने लढवावी, अशा सूचना कार्यकर्त्यांमधून आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडताना, महाविकास आघाडीसोबत लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिलेले पक्षाचे योगदान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्याची ही योग्य वेळ आहे, यावर जोर दिला. या बैठकीला जिल्हाभरातून सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अशोक सोनवणे, सुभाष लोणके, नानाभाऊ वाल्हेकर, सुनील पाटोळे, सचिन उदार, नवनाथ कांबळे यांसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.













