पोलिस प्रशासन न्यूज.

स्वातंत्र्याचा उत्सव, गुणवंतांचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणेची शिदोरी! धर्मवीर संभाजी हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी )

अंबड : तालुक्यातील डोमेगाव येथील धर्मवीर संभाजी हायस्कूल, येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत स्वातंत्र्यदिनाचा संदेश गावभर पोहोचवला. शाळेत विद्यार्थ्यांची भाषणे, स्वयंप्रेरित देशभक्तीपर गीतांचे गायन अशा विविध उपक्रमांतून राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्यात आली. स्वातंत्र्याचा अभिमान, गुणवत्तेचा सन्मान आणि संस्कारातून घडणारी नवी पिढी—यांचा सुंदर संगम धर्मवीर संभाजी हायस्कूलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

 

याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. रावसाहेब जायभाये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीकडे गांभीर्याने लक्ष देत नियमितपणे शाळेत येऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन शाळेशी सातत्यपूर्ण संवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

डोमेगावचे प्रथम नागरिक सरपंच डॉ. अशोक काळबंडे यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा शिक्षणाचा महत्त्वाचा त्रिकोण असून या तिन्ही घटकांमध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेच्या संपर्कात राहून आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत नियमित माहिती घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

—-

चौकट :

माजी विद्यार्थी संतोष शेळके यांची आईच्या स्मृतींना अनोखी मानवंदना

 

या कार्यक्रमाचे आणखी एक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. संतोष शेळके यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेल्या ‘मुक्ताई गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारा शुभम चंद्रकांत सांगळे यांस १०,००० रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, नववीमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी साक्षी गणेश रणमळे हिला ५,००० रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, आणि आठवीमध्ये प्रथम आलेला कार्तिक रमेश सांगळे याला ३,००० रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. संतोष शेळके यांनी शाळेच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. एका आईच्या स्मृतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला बळ देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष भावनिक क्षण ठरला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगन दुर्गे यांनी आपल्या मनोगतात पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे आवाहन केले. गावातील प्रत्येक नागरिकाने विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले की, मुले हा देशाचा खजिना आहेत; त्यांच्यात देशासाठी काहीतरी मोठे करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता ओळखून घडवण्याचे काम शिक्षक करतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कल्याण जायभाये यांनी केले, श्री. नाटकर यांनी आभार मानले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!