नांदेड प्रतिनिधी
नांदेड, दि. ११ : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारकडून संकेत दिले जात असताना, या उपवर्गीकरणामुळे मातंग समाजाचे मोठे आणि कधीही भरून न येणारे नुकसान होईल. त्यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मातंग समाजाचा ठाम विरोध असल्याचे अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बा. रा. वाघमारे यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरवाद्यांकडून काढण्यात आलेल्या आरक्षण उपवर्गीकरणविरोधी महामोर्चात ते बोलत होते. यावेळी वाघमारे यांनी आक्रमक भूमिका मांडत, “उपवर्गीकरणाचा निर्णय मातंग समाजाच्या हिताचा नाही. फुले-आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवूनच समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करू,” असे सांगितले.
उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढ्यात आंबेडकरवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून मातंग समाज सहभागी राहील आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी संघर्ष तीव्र केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.












